|
नियोजित सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प ( २ न् १२.५ मॅ.वॅ.)
|
| प्रस्तावना व स्थळ :- पेनगंगा नदी गोदावरी नदीची प्रमुख उपनदी असून या नदीची एकूण लांबी ६७३ कि.मी. आहे. ही नदी बुलढाणा जिल्हयातील मढ या गावी उगम पावते व पुढे वर्धा नदीस मिळते. या नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र २२९४७ चौ.कि.मी. असून सहस्त्रकुंड धरणस्थळी पाणलोट क्षेत्र ८७८२ चौ.कि.मी. आहे. उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाच्या खाली मुक्त पाणलोट क्षेत्र २५५३ चौ.कि.मी. उपलब्ध असून ७५ टक्के विश्वासार्ह पाणी उपलब्धता ४३४ दलघमी आहे. (५० टक्के विश्वासार्ह येवा ६८४ दलघमी, ९०टक्के विश्वासार्ह येवा २६१ दलघमी आहे) या नदीवर उगमापासून ३७६ कि.मी. अंतरावर ३६.६ मी. खोलीचा सहस्त्रकूंड धबधबा असून या नदीस इंग्रजी `यु` आकाराचे ७५ कि.मी. लांबीचे वळण असून या वळणाचा उपयोग केल्यास १२० मी. खोली उपलब्ध होते. या खोलीपैकी ८० मी. जलविद्यूत निर्मितिकरीता वापरणे व उर्वरीत ४० मी. खोली प्रवाही सिंचनाकरीता वापरणे प्रस्तावित आहे. सहस्त्रकुंड धबधब्याच्या वरच्या भागात १६ कि.मी. अंतरापर्यंतचा भाग आता पेनगंगा अभयारण्य म्हणून घोषित केलेला असल्याने सहस्त्रकुंड धरणाचे स्थान मौजे कौठातांडा ता. हिमायतनगर, जि. नांदेड गावाच्या वरील बाजूस निश्चित केले आहे. सहस्त्रकुंड धरणाच्या बुडित क्षेत्रात आता अभयारण्याचा भाग बुडित होत नाही. या प्रकल्पात पेनगंगा नदीवर ७.०० अ.घ.फूट क्षमतेचे (२००.०० दलघमी) मुख्य धरण प्रस्तावित असून निंगणूर नाल्यावर ३.०० अ.घ. फूट क्षमतेचे (८०.०० दलघमी) सॅडल धरण प्रस्तावीत आहे. पेनगंगा नदीवरील मुख्य धरण व निंगणूर नाल्यावरील सॅडल धरण ढाणकी नाल्यातून उघडया जोड कालव्याव्दारे (Open Cut Link Canal) जोडले जाणार आहे. या दोन्ही धरणाची पूर्ण संचय पातळी एकच ठेवण्यात येणार असल्याने जलविद्यूत निर्मितीसाठी शीर्ष व्यय (Loss of Head) होणार नाही. सॅडल धरणात वनजमिन अथवा अभयारण्याचा भाग बुडित होत नाही. सहस्त्रकुंड प्रकल्पाचे ३० टक्के पाणी सॅडल धरणात साठविल्याने पेनगंगा नदीकाठाची २००० हेक्टर सुपीक जमिन व ७ गावे बुडित होण्यापासून वाचणार आहेत. सॅडल धरणाचे बुडित क्षेत्र ओसाड खडकाळ भागाचे असून पूर्ण संचय पातळीपर्यंत केवळ ५५२ हेक्टर क्षेत्र बुडित होणार आहे. |
| जलविद्यूत गृह स्थान :- सॅडल धरणाच्या निम्न भागात १३०० मी. अंतरावर व निंगणूर नाल्याच्या उपनाल्यावर जलविद्यूत गृहाचे स्थान निश्चित करण्यात आलेले आहे. या जागी जमिनीवरील २५.०० मॅ.वॅट क्षमतेचे जलविद्यूत गृह (Surface Power House) प्रस्तावित असून जलविद्यूत गृहापर्यंत पाणी वाहून आणण्यासाठी बंदिस्त दाबयुक्त पाईपचा वापर होणार आहे. (Pressured Close Conduit) पाईपलाईनच्या शेवटी सर्ज विहिर व त्यापुढे पेनस्टॉक पाईपव्दारे जलविद्यूत गृहात पाणी वाहून २५.०० मॅ.वॅ. स्थापित क्षमतेने ५९.०० द.ल.युनीट (७५ टक्के विश्वासाहर्तेने) जलविद्यूत निर्मिती होईल. जलविद्यूत निर्मितीनंतरचे पाणी अमडापूर तलावात सोडणे व या तलावातून डोंगराच्या पायथ्यास समांतर असा समतल कालवा (Contour Canal) काढून सिंचनास वापरुन यवतमाळ जिल्हयाचे ९९०० हेक्टर क्षेत्र (I.C.A.) प्रवाही सिंचनाखाली येणार आहे. जलविद्यूत निर्मिती व त्याच पाण्याचा उपयोग प्रवाही सिंचनाकरीता करणे असा दुहेरी फायदा या प्रकल्पात होणार आहे. |
|
पुनर्वसित करावी लागणारी गावे व संपादित करावी लागणारी जमीन :- |
| या प्रकल्पाच्या मुख्य धरणात यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील नदीकाठी वसलेली मौजे करंजी, सिंदगी, सावळेश्वर ही लहान आकाराची गावे व बिटरगाव तांडा क्र. १ व २ ही अंशत: बाधित होणारे तांडे पुनर्वसित करावी लागणार आहेत. त्याचप्रमाणे नांदेड जिल्हयातील
हिमायतनगर तालुक्यातील मौजे कौठा, सिरपल्ली व डोलारी ही गावे पुनर्वसित करावी लागणार आहेत. सॅडल धरणात
हिरामणनगर तांडा (पूर्वीची वानरवाडी) ही अतिशय छोटी वस्ती बुडित होणार आहे. अश्या
रितीने या प्रकल्पात एकूण सहा गावे व ३ तांडे यांचे पूर्णपणे नवीन जागी पुनर्वसन करणे प्रस्तावित आहे. पुनर्वसित करावी लागणारी सहाही गावे एरवी पूरग्रस्त असल्याने त्यांचे पुनर्वसन करण्यास फारसा विरोध नाही. या प्रकल्पात एकूण ५६१३ हेक्टर जमीन बुडित होणार असून शासकिय जमीन वगळता साधारण ५११३ हेक्टर खाजगी जमीन संपादित करावी लागेल. यापैकी २४४० हेक्टर जमीन गाळपेरास उपलब्ध होईल. वरील सर्व गावांचे नवीन जागी पुनर्वसन व लागणा-या बुडित जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पात पाणी अडविले जाणे प्रस्तावित आहे. `आधी पुनर्वसन व मग प्रकल्प` असा धोरणात्मक निर्णय झालेला आहे. |
|
प्रकल्पाची सद्य:स्थिती :- सहस्त्रकुंड प्रकल्पाचे क्षेत्रीय सर्वेक्षण बहुतांशी पूर्ण झाले असून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. सविस्तर प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर अंतिम संकल्पन करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. |